डेक्कन एज्युकेशन सोसायटीची नवीन मराठी शाळा सातारा येथे एक राखी सैनिकांसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
देशसेवेसाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या सैनिक बांधवांच्या समर्पण भावनेला स्नेहाच्या बंधनाची जोड देण्याच्या हेतूने 'एक राखी सैनिकांसाठी' या उपक्रमाअंतर्गत शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून आकर्षक, तिरंगी, विविध साहित्याचा वापर करून सुबक राख्या तयार केल्या. तसेच भारतीय जवानांच्यासाठी शुभेच्छा संदेशांचे लेखन सुद्धा विद्यार्थ्यांनी केले. या तयार झालेल्या सर्व राख्या व शुभेच्छा संदेश सध्या भारतीय वायुसेनेमध्ये कार्यरत असणारे ज्युनिअर वॉरंट ऑफिसर श्री संग्राम तुकाराम डांगे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
राष्ट्रीय संपत्तीचा काटकसरीने वापर तसेच परिसर स्वच्छता या कार्यातून विद्यार्थी सुद्धा देशसेवेच्या कार्यामध्ये सहभागी होऊ शकतात याबाबत श्री. संग्राम डांगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांनी देशसेवेमध्ये आपला खारीचा वाटा उचलण्याचा संकल्प केला. या उपक्रमासाठी माजी सैनिक मा.श्री. विनीत पाटील यांचे सहकार्य लाभले.
शाला समितीचे अध्यक्ष मा.श्री. सारंग कोल्हापुरे, सदस्य मा.श्री. अनंत जोशी, मा.श्री. अमित कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनानुसार व शालाप्रमुख मा.सौ. तनुजा तिकोने यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन भारतीय जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.सौ. मनिषा मोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.श्रीमती मनिषा चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी सर्व विद्यार्थी व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
मुख्याध्यापिका
नवीन मराठी शाळा सातारा