श्री. कांतिलाल पुरुषोत्तमदास शहा प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न !

12 Jan 2026 14:52:14
annual day
*श्री. कांतिलाल पुरुषोत्तमदास शहा प्रशाला प्राथमिक विभाग मराठी माध्यम , सांगली.
   प्रशालेत सोमवार दि. २९/१२/२०२५ ते बुधवार दि. ३१/१२/२०२५ या कालावधीत वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले.
प्रशालेचे मुख्याध्यापक पुंडलिक माने व स्नेहसंमेलनाचे कार्याध्यक्ष बाळकृष्ण पांढरे यांच्या हस्ते रंगमंचाचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचे दर्शन घडविणारा विविध गुणदर्शनाचा पूर्वार्ध यादिवशी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
शाला समितीचे सदस्य रवींद्र ब्रम्हाळकर व प्रशालेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. रवींद्र ब्रम्हाळकर यांनी आपल्या मनोगतात "विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात प्रामाणिकपणे ध्येयाशी एकनिष्ठ राहून वाटचाल करावी व त्या प्रवासाला कलेची साथ द्यावी," असे मौलिक विचार व्यक्त केले. यादिवशी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा पंडित व रामचंद्र पाटील यांनी केले, तर उपस्थितांचे आभार वैष्णवी पोतदार यांनी मानले.
मंगळवार दिनांक ३०/१२/२०२५ रोजी विविध गुणदर्शन कार्यक्रमाचा उत्तरार्ध संपन्न झाला. या दिवशी लोकशाहीर बजरंग आंबी व प्रशालेचे मुख्याध्यापक पुंडलिक माने यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. लोकशाहीर बजरंग आंबी यांनी आपल्या मनोगतात "जीवनातील नैराश्य, ताणतणाव दूर करून उत्साह वाढवायचा असेल, तर कला व सकारात्मक विचार यांना पर्याय नाही," असा विद्यार्थी व पालकांना कानमंत्र दिला. यादिवशी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण पांढरे व शैलेश घडोजे यांनी केले. विविध गुणदर्शन कार्यक्रमासाठी यावर्षी *संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष* तसेच *‘वंदे मातरम् सार्ध शती महोत्सव’* चे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांचा संन्यास, चांगदेवांचे गर्वहरण, ताटीचे अभंग, मांडे भाजले, भिंत चालवली इत्यादी ज्ञानेश्वरांच्या जीवनातील प्रसंग विद्यार्थ्यांनी सादरीकरणातून दाखवले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. उपस्थितांचे आभार संमेलनाचे कार्याध्यक्ष बाळकृष्ण पांढरे यांनी मानले.
बुधवार दि. ३१/१२/२०२५ रोजी पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे  डॉ. सूर्यकांत धोंडीराम व्हावळ व प्रणोती सूर्यकांत व्हावळ उपस्थित होते. तसेच शाळा समिती अध्यक्ष डॉ. विश्राम लोमटे, शाळा समिती सदस्य रविंद्र कुलकर्णी, प्रशालेचे मुख्याध्यापक पुंडलिक माने, स्नेहसंमेलन कार्याध्यक्ष बाळकृष्ण पांढरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख अनघा दणाणे, विद्यार्थी प्रतिनिधी चि. अनिकेत न्यामगौड व विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. श्रेया दळवी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. प्रशालेचे मुख्याध्यापक पुंडलिक माने यांच्या शुभहस्ते प्रमुख पाहुण्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. पुंडलिक माने यांनी करून दिला. विद्यार्थी प्रतिनिधींनी आपले मनोगत मांडले.
स्नेहसंमेलनाचे कार्याध्यक्ष बाळकृष्ण पांढरे यांनी शालेय वार्षिक अहवालाचे वाचन केले. शालासमिती अध्यक्ष मा. डॉ. श्री. विश्राम लोमटे यांनी मनोगतातून "पालकांनी आपल्या पाल्यांचे बलस्थान ओळखावे त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करावे. पाल्याची ध्येयपूर्ती करण्यासाठी विद्यार्थी-जीवनात शाळा महत्त्वाच्या असतात. विद्यार्थ्यांना शाळा सुसंस्कृत करतात" असे मत व्यक्त केले . प्रमुख पाहुणे मा. डॉ. सूर्यकांत व्हावळ यांनी "विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर रहावे तसेच आई-वडील व गुरुजनांचा आदर बाळगावा" असे मोलाचे विचार व्यक्त केले.
यानंतर वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न झाला. स्नेहभोजनाचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आस्वाद घेतला. 
अशाप्रकारे विविध गुणदर्शन कार्यक्रम व पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत आनंदी, उत्साही व यशस्वी वातावरणात पार पडला.
Powered By Sangraha 9.0