महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला, पुणे येथे “सृजनाला पंख नवे – अंतर्गत अभ्यासोनी प्रकटावे” या संकल्पनेअंतर्गत दिनांक १३ जानेवारी २०२६, मंगळवार रोजी शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.
या शैक्षणिक प्रदर्शनाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे, त्यांच्या सर्जनशीलतेला चालना देणे तसेच पाठ्यपुस्तकातील ज्ञान प्रत्यक्ष कृती, प्रयोग व सादरीकरणातून प्रभावीपणे मांडणे हा होता.
या कार्यक्रमासाठी प्रशालेचे प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक व १९९१ बॅचचे माजी विद्यार्थी श्री. राजेंद्र बुट्टे पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक रोहिदास भारमळ सर यांनी केले. त्यांनी शैक्षणिक प्रदर्शनामागील संकल्पना, नियोजन व विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व विशद केले.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रशालेच्या शिक्षिका भारती कुंभार मॅडम यांनी करून दिला. आपल्या मनोगतात प्रमुख पाहुणे राजेंद्र बुट्टे पाटील यांनी शाळेने दिलेले संस्कार आजही मनात घट्ट रुजले असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये स्वतःचे प्रतिबिंब दिसत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. शाळेतील संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शिस्त यामुळेच जीवनात यशाची पायरी गाठू शकलो, असे त्यांनी नमूद केले व सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक आभार मानले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे महामात्र डॉ. निर्भय पिंपळे सर होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे, सादरीकरण कौशल्याचे व परिश्रमाचे विशेष कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षकांचेही अभिनंदन करून विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या शैक्षणिक प्रदर्शनामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, शारीरिक शिक्षण, संगणक व पर्यावरण या सर्व विषयांचे स्टॉल, मॉडेल्स, चार्ट व प्रतिकृती विद्यार्थ्यांनी अतिशय आकर्षक पद्धतीने मांडल्या होत्या. यासोबतच विज्ञान प्रदर्शन, गणित प्रदर्शन व ग्रंथालय प्रदर्शन ही विशेष आकर्षणे यावेळी भरविण्यात आली होती.
प्रदर्शनादरम्यान झाडांना लावलेले QR कोडचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या QR कोडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या मोबाईलच्या माध्यमातून झाडांची माहिती व त्यांचे महत्त्व व पर्यावरणीय उपयुक्तता सहजपणे विद्यार्थ्यांना पाहता येईल.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे १९९१ च्या बॅचचे प्रशालेचे माजी विद्यार्थी राजेंद्र बुट्टे पाटील प्रशालेचे महामात्र डॉ.निर्भय पिंपळे सर ,प्रशालाचे मुख्याध्यापक रोहिदास भारमळ सर, प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ.सुनीता गायकवाड मॅडम, पर्यवेक्षिका सौ.जयश्री शिंदे मॅडम, समाजसेविका रेणू गावस्कर ,उजळंबकर सर,प्रशालेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका स्वप्नाली देशपांडे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचा
उपस्थित आभार प्रशालेच्या पर्यवेक्षिका जयश्री शिंदे मॅडम यांनी मानले.
हे शैक्षणिक प्रदर्शन पाहण्यासाठी संस्थेच्या विविध शाखांतील विद्यार्थी, प्रशालेचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकवर्ग उपस्थित होता. अत्यंत उत्साहपूर्ण, आनंदमय व ज्ञानवर्धक वातावरणात “सृजनाला पंख नवे – अंतर्गत अभ्यासोनी प्रकटावे” हे शैक्षणिक प्रदर्शन यशस्वीरीत्या संपन्न झाले.
प्रदर्शनादरम्यान झाडांना लावलेल्या QR कोडचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या QR कोडच्या माध्यमातून मोबाईल फोनद्वारे संबंधित झाडांची माहिती, त्यांचे महत्त्व व पर्यावरणीय उपयुक्तता सहजपणे पाहता येत होती.