न्यू इंग्लिश मीडियम स्कूल व वनराई इको क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेत बोर महोत्सवाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या उपक्रमात इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या बोरांपासून आकर्षक व उपयुक्त पदार्थ, बोरापासून तयार केलेल्या वस्तू तसेच बोरांचे दागिने बनवून आपली कल्पकता आणि सर्जनशीलता प्रभावीपणे सादर केली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. प्रीतम जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक करत बोरासारख्या स्थानिक फळांचे पोषणमूल्य, औषधी उपयोग व पर्यावरणीय महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
या महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बोरांविषयी सखोल माहिती मिळाली तसेच पर्यावरण संवर्धन, स्थानिक जैवविविधता आणि आरोग्यदायी आहाराचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रशालेतील वनराई इको क्लबच्या समन्वय शिक्षिका अक्षदा इनामदार व प्रशालेतील शिक्षिका सौ. नीरजा बेलसरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग व शिक्षकांचे सहकार्य यामुळे बोर महोत्सव संस्मरणीय ठरला.