महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या निमित्ताने आयुर्वेदिक उटणे तयार करण्याचा अभिनव उपक्रम राबविला. मा. मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अकरा आयुर्वेदिक वनस्पतींपासून तयार केलेल्या चूर्णाचा वापर करून उटणे बनविले.
या उटण्याच्या निर्मितीसाठी आवळा, त्रिफळा, गुलाब, ज्येष्ठमध, बावची, आंबेहळद, संत्रा, कापूरकाचरी, नागरमोथा, अनंतमूळ आणि वाळा या वनस्पतींचा वापर करण्यात आला. या वनस्पतींचे आयुर्वेदातील महत्त्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वतः उटणे तयार केले आणि त्याची विक्रीही केली.
भारतीय संस्कृतीला आयुर्वेदाची समृद्ध परंपरा लाभली आहे. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातही या परंपरेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, तसेच पारंपरिक ज्ञानाची ओळख व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. उटणे तयार करण्यापासून ते त्याच्या विक्रीपर्यंतच्या प्रक्रियेत सहभागी झाल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर त्यांच्यात उद्योजकता, विक्री कौशल्य, सहकार्याची भावना आणि स्वावलंबन हे गुण विकसित होण्यास मदत झाली.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि सर्जनशीलतेला चालना मिळाली. स्वतःच्या हातांनी एखादी वस्तू तयार करून तिची विक्री करण्याचा आनंदही विद्यार्थ्यांनी अनुभवला.
शाला समिती अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, महामात्रा डॉ. मानसी भाटे, मा. मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे आणि उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.