आपलं घर येथे चिमुकल्यांची माणुसकीची दिवाळी!

शिक्षण विवेक    04-Nov-2026
Total Views |
des
दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांचा आणि फराळाचा सण नव्हे, तर आनंद वाटण्याचा, प्रेमाची उब देण्याचा आणि माणुसकीची ज्योत प्रज्वलित करण्याचा उत्सव! याच भावनेतून डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, पूर्व प्राथमिक विभागातील सीनियर केजीच्या चिमुकल्यांनी यंदाची दिवाळी श्री. विजय फळणीकर यांच्या 'आपलं घर' या संस्थेत मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली.
सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील 'आपलं घर' या संस्थेत लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिक वास्तव्यास आहेत. या भेटीच्या निमित्ताने पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सामाजिक जाणीव आणि सहकार्याची भावना जपत संस्थेला डाळ, तांदूळ, साखर, गहू आणि विविध जीवनावश्यक वस्तू प्रेमपूर्वक भेट दिल्या. संस्थेच्या परिसरात शिक्षकांनी आकर्षक रांगोळ्या काढून, पणत्या प्रज्वलित करून आणि रंगीबेरंगी आकाशकंदील लावून दिवाळीचा उत्साह द्विगुणित केला. प्रकाश, रंग आणि आनंदाने संपूर्ण परिसर उजळून निघाला. शिक्षिका स्वाती मेहेंदळे यांच्या कल्पनेतून साकारलेला हा उपक्रम, शिक्षिका प्राची पासलकर यांच्या विशेष सहकार्याने साकारला गेला. उपक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा कुलकर्णी यांचे बहुमोल मार्गदर्शन होते
.