एन.ई.एम.एस शाळेत रंगली व्हायोलिन वादनाची अनोखी मैफल...
दि. २ फेब्रुवारी रोजी शनिवार पेठेतील एन.ई.एम.एस शाळेत स्पीकमॅके या राष्ट्रीय स्तरावरील स्वयंसेवी संस्थेमार्फत व्हायोलिन वादक लालगुडी जी.जे.आर कृष्णन यांची अनोखी मैफल आयोजित केली होती. त्यांना मृदुंगाची साथ बी.गुरु राघवेंद्रम तसेच घटमची साथ श्री.एच.शिवरामकृष्णन या कलाकारांनी केली.
शाळेतील इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाला ज्येष्ठ व्हायोलिन वादक श्री.अतुलकुमार उपाध्ये, शाला समिती अध्यक्ष अमित कुलकर्णी,कौन्सिल मेंबर मिलिंद कांबळे, प्रीती अभ्यंकर तसेच सर्व विभागचे मुख्याध्यापक व पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. लालगुडी कृष्णन यांनी राग - मालकंस तसेच कल्याण रागातील रचना सादर केल्या. त्यानंतर त्यांनी तिल्लाना गीतप्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनीदेखील संगीताचा आनंद घेत त्यावर ताल धरला.
भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, तसेच शास्त्रीय संगीताबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात आदर,अभिमान निर्माण व्हावा या उद्देशाने शाळेच्या मुख्याध्यापिका हेमांगी देशमुख यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाने सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका शिवानी फडके यांनी केले तर आभार शिक्षिका श्रद्धा रांजेकर यांनी व्यक्त केले.