श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय माजलगावच्या सहशिक्षिका अनुराधा प्रल्हादराव लाहोरकर-खुरपे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार
माजलगाव येथील श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालयाच्या सहशिक्षिका अनुराधा प्रल्हादराव लाहोरकर-खुरपे यांना 'बी द चेंज फाउंडेशन'तर्फे दिला जाणारा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ प्राप्त झाला असून, हा त्यांचा २५वा मानाचा पुरस्कार आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे माजलगाव तालुक्यासह संपूर्ण परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनुराधा लाहोरकर-खुरपे यांनी एम.ए. (इंग्लिश), डी.एड. असे उच्च शिक्षण घेतले असून, त्या शाळेत माता-पालक संघ प्रमुख तसेच शिक्षण विवेक प्रतिनिधी म्हणून जबाबदारीने कार्यरत आहेत. अध्यापनाबरोबरच त्या लेखिका, कवयित्री, कथाकार व प्रभावी निवेदिका म्हणून साहित्यिक क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांच्या लेखनाला वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके व दिवाळी अंकांत सातत्याने प्रसिद्धी मिळत आहे.
त्यांचे ‘आनंद’ हे स्वलिखित पुस्तकआहे . हे पुस्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमी, लातूर तर्फे राज्यस्तरीय पुरस्काराने उत्कृष्ट साहित्य म्हणून सन्मानित झाले आहे. तसेच राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्यिक म्हणून अनुराधा लाहोरकर-खुरपे यांचा सन्मान झाला आहे. त्या आम्ही सिद्ध लेखिका सदस्य, माजलगाव साहित्य चळवळ महिला प्रतिनिधी, वीरशैव महिला मंडळ सदस्य, मराठवाडा साहित्य परिषद शाखा माजलगाव सदस्य, तसेच संस्कार भारती सदस्य आहेत.त्यांनी २५१वा एक दिवस मराठीचा या उपक्रमात (३ ऑक्टोबर २०२२) परिसंवाद सादर केला. १४वे शिवार साहित्य संमेलन, गंगामसला (मार्च २०२३) येथे त्या निमंत्रित कवी म्हणून सहभागी झाल्या. शिक्षणविवेक मासिकाच्या संपादक मंडळावर २०२३मध्ये नियुक्ती, तसेच लोकमत सखी मंच प्रतिनिधी म्हणून त्या कार्यरत आहेत. २०वे समरसता साहित्य संमेलन, नांदेड येथे नंदिग्राम काव्ययात्रा सत्रात त्यांनी स्वरचित कविता सादर केली. सुखकर्ता प्रतिष्ठान मालेगाव राज्यस्तरीय कवी संमेलनात (२०२५) सहभाग, तसेच बीड भिडेवाडा कविसंमेलनाचे अध्यक्षपद (२०२५) भूषविले आहे.यापूर्वी त्यांना विविध शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील २४ पुरस्कार प्राप्त झाले असून, त्यामध्ये लोकमत वुमन अचिव्हर्स अवॉर्ड, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमी राज्यस्तरीय पुरस्कार, दैनिक लोकमत कर्तृत्ववान महिला पुरस्कार, साहित्य दुर्गा पुरस्कार, उत्कृष्ट वक्तृत्व सन्मान, राज्यस्तरीय काव्य लेखन पुरस्कार यांसह अनेक मानाच्या सन्मानांचा समावेश आहे. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार हा त्यांचा २५वा पुरस्कार ठरला आहे.शिक्षण, साहित्य आणि समाजकार्य या तिन्ही क्षेत्रांत सातत्यपूर्ण व भरीव योगदान देणाऱ्या सौ. अनुराधा प्रल्हादराव लाहोरकर-खुरपे यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक शिक्षक, विद्यार्थी व महिलांना प्रेरणा मिळत आहे.