विवेक साहित्य मंच आयोजित युवा आणि बाल साहित्य संमेलन २०२६

    04-Feb-2026
Total Views |
 

विवेक साहित्य मंच आयोजित युवा आणि बाल साहित्य संमेलन २०२६ दिनांक ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी या दोन दिवसात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फीथिएटरमध्ये आयोजित करण्यात आले होते. शनिवार, दिनांक ३१ जानेवारी या दिवशी युवा संमेलनाची सुरुवात डी.ई.एस. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या 'गाव हा माझा' या कार्यक्रमाने झाली. त्यानंतर अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूलच्या मुलींनी 'रागमाला' हा कार्यक्रम सादर केला. संमेलनाचे उद्घाटन मा. सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी महाराष्ट्र काल, आज आणि उद्या या विषयावर मार्गदर्शन केले. उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ मल्लखांब पटू उदय देशपांडे, डि.ई.एस. चे कार्यवाह डॉ. आनन्द काटीकर, विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर, अभय टिळक, संध्या जिंतूरकर, सुधीर इनामदार, ममता क्षेमकल्याणी इत्यादी उपस्थित होते. उद्घाटन सत्रामध्ये शिल्पकार चरित्रकोश या प्रकल्पातील राजकारण-समाजकारण-पत्रकारिता आणि उद्योग-अर्थकारण-क्रिडा या खंडांचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक साहित्य मंचाच्या संयोजक डॉ. अर्चना कुडतरकर यांनी केले.
यानंतर झालेल्या अ.ल.क. आणि कविता सादरीकरण या सत्राचे अध्यक्षपद आदित्य दवणे यांनी भूषवले. अनुवादाच्या संधी या सत्रामध्ये राजीव श्रीखंडे यांनी मार्गदर्शन केले. पुस्तकाचे अंतरंग या पुस्तक परीक्षण सादरीकरण सत्राचे अध्यक्ष नितीन थोरात होते. संमेलनाची सांगता म.ए.सो. गरवारे महाविद्यालयाच्या 'महाराष्ट्राची लोकधारा' या कार्यक्रमाने झाली.
रविवार, दिनांक १ फेब्रुवारी दुसर्‍या दिवशी बालसाहित्य संमेलनाची सुरुवात स... संविधानाचा या नाटकाने झाली. त्यानंतर बालसाहित्य संमेलनाची भूमिका शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर यांनी मांडली. या वेळी व्यासपीठावर बालसाहित्यिक राजीव तांबे, संजीवनी शिंत्रे, ममता क्षेमकल्याणी उपस्थित होते. त्यांनी पालकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर झालेल्या कविता मुलांच्या या सत्राचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. भोजनानंतर 'काय म्हणता' हे नाट्यछटा सादरीकरण सत्र झाले. या सत्राचे अध्यक्ष म्हणून अमृत सामक उपस्थित होते. त्यानंतर 'शिक्षण माझा वसा २०२६' हा उपक्रमशील शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. या पुरस्कार सोहोळ्यासाठी मिलिंद कांबळे, श्रीकांत देव, पुष्कर लेले, राजीव तांबे, ममता क्षेमकल्याणी, संजीवनी शिंत्रे आणि डॉ. अर्चना कुडतरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. बालसाहित्य संमेलनाची सांगता मॉडर्न महाविद्यालयाच्या 'नाच रे मोरा' या कार्यक्रमाने झाली.
अशा प्रकारे हे दोन दिवसीय साहित्य संमेलन संपन्न झाले.