
सोमवार दिनांक १५ जून २०२६ रोजी नवीन शैक्षणिक वर्षाच्या आरंभी इ. ५ वी च्या विद्यार्थ्यांसाठी 'शाला प्रवेशोत्सवाचे ' आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेचे प्रवेशद्वार रांगोळ्यांनी सजवले. बालकांच्या आवडत्या मिकी माऊस आणि डोनाल्ड डक या कार्टून्सनी तसेच NCC च्या विद्यार्थ्यांनी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने झाली. संगीत शिक्षक हर्षद गाडगीळ यांनी या गीतासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशालेच्या मुख्याध्यापक आशा माने यांनी पर्यावरण रक्षण या मूल्याचा वारसा जपणारी बोधकथा सांगितली.
प्रशालेचे माजी शालासमिती अध्यक्ष तसेच प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. शरद अगरखेडकर यांच्या हस्ते पाटीपूजन करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरुपात काही नवप्रविष्ट विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तकांचे संच देण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला मराठी सुलेखन पुस्तिका आणि पेढा देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
यावेळी पाहुण्यांनी शाळेची गुणवत्ता आणि मूल्यांचा वारसा कायम राखण्याचा आशीर्वाद विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थ्यांना वर्गशिक्षकांची ओळख करुन देण्यात आली. उपमुख्याध्यापक महेश जोशी यांनी शाळेच्या विविध विभागांची माहिती सांगितली. तसेच आवश्यक सूचना दिल्या. यावेळी कार्टून्स म्हणून स्वागत करणाऱ्या प्रत्युष महामुनी आणि ओम बोरकर या माजी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. नाट्यकर्मी रवींद्र सातपुते यांची ही कल्पना होती.
कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षक मंजुषा शेलुकर यांनी मानले. प्रशालेच्या प्रवेशद्वाराजवळ चित्रकला शिक्षिका अंजली मालुसरे यांनी अतिशय सुंदर सेल्फी पॉईंट तयार केला, जिथे नवागत विद्यार्थ्यांनी फोटो काढला.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या
'एक पेड मा माँ के नाम ' या पर्यावरणपूरक संकल्पनेचा आधार घेऊन प्रशालेच्या प्रांगणात पालकांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.त्यासाठी पर्यावरण विभाग प्रमुख हेमंत पाठक यांनी पालकांच्या मदतीने रोपे उपलब्ध करुन दिली.प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका वैशाली भोकरे यांनी सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमासाठी विद्यमान शालासमिती अध्यक्ष मिलिंद कांबळे मुख्याध्यापक आशा माने, उपमुख्याध्यापक महेश जोशी, पर्यवेक्षक अंजली गोरे आणि मंजुषा शेलूकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षक प्रतिनिधी प्रतिभा जक्का आणि ग्रंथपाल शैलेश नागवडे यांचे या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले.