
अमृतवाणी संस्कृतभाषाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासाठी प्रशालेमध्ये संस्कृत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. दिनांक 22 ऑगस्ट ते 29 ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रशालेत सुरु करण्यात आलेल्या सुभाषित पठणकेंद्राद्वारे पाचवी, सहावी सातवी वर्गातील विद्यार्थ्यांचे सामूहिक सुभाषित पठण झाले. महाकवी कालिदास विरचित रघुवंश महाकाव्यातील पाचव्या सर्गातील निवडक श्लोकांचे विशेष अध्यापन माजी विद्यार्थी श्री. शरद कातरकी यांनी केले. दिनांक 27 ऑगस्ट रोजी प्रशालेत संस्कृत दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापिका आशा माने यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्कृतभारती पश्चिममहाराष्ट्रप्रांताचे प्रमुख कर्नल सतीश परांजपे उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कर्नल सतीश परांजपे यांनी संस्कृत भाषेला बोलीभाषेचा दर्जा प्राप्त व्हावा म्हणून विद्यार्थ्यांनी रोजच्या व्यवहारात संस्कृत संभाषण केले पाहिजे असे प्रतिपादन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्तोत्रपठण, सुभाषित पठण, संख्याक्रीडा, संस्कृत संभाषण, संस्कृत गाणी, कथाकथन, नाट्यवाचन इत्यादी कार्यक्रमांचे सादरीकरण केले. व्यासपीठावर यावेळी पर्यवेक्षिका मंजुषा शेलूकर, कसबाजनपदप्रमुख सोनल दवे, माधवी गोडबोले उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभाग प्रमुख वर्षा गानू यांनी केले अतिथी परिचय प्रज्ञा करडखेडकर यांनी करुन दिला तर आभार प्रदर्शन शीतल चौधरी यांनी केले.
रक्षाबंधनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी वर्गावर्गात सुंदर अशा आकर्षक राख्या तयार केल्या, नववीतील विद्यार्थ्यांनी बीज राख्या देखील तयार केल्या. एकमेकांना बांधल्या तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना देखील विद्यार्थ्यांनी राखी बांधली. परिवहन समितीतर्फे सर्व वाहनचालकांना सातवीतील विद्यार्थ्यांनी राखी बांधली. शाळेतील वृक्षांना देखील राखी बांधून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली गेली. यानिमित्ताने प्रशालेत रिक्षापूजन देखील करण्यात आले.हा सर्व कार्यक्रम प्रशालेच्या मुख्याध्यापिका आशा माने,उपमुख्याध्यापक महेश जोशी,पर्यवेक्षक अंजली गोरे, मंजुषा शेलुकर यांच्या मार्गदर्शनाने यशस्वी झाला.