पुणे : दिनांक २९ ऑगस्ट २०२६ वार - शनिवार रोजी न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, शनिवार पेठ येथे राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती हेमांगी देशमुख आणि माध्यमिक विभागाच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. आसावरी सिंगासने यांच्या हस्ते झाले. यावेळी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी टायर शर्यत, रस्सीखेच, गोट्या, भोवरा, लगोरी, संगीत खुर्ची, सापशिडी, आंधळी कोशिंबीर, टिपरी पाणी आदी विविध पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत या खेळांचा मनमुराद आनंद लुटला.
विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती हेमांगी देशमुख यांनी स्वतः विद्यार्थ्यांसोबत विविध खेळांमध्ये सहभागी होत खेळांचा मनमुराद आनंद घेतला. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला.
मुख्याध्यापिका श्रीमती हेमांगी देशमुख व माध्यमिक विभागाच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. आसावरी सिंगासने यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. प्रमोद उकिर्डे, श्री. देविदास वाकळे आणि श्री. श्रीकांत खुटवड यांनी विद्यार्थ्यांना पारंपरिक खेळांची ओळख करून देत त्यांना जुन्या खेळांच्या रम्य दुनियेत नेण्याचे सुंदर कार्य केले. मोबाईल आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात लोप पावत चाललेल्या पारंपरिक खेळांचा आनंद विद्यार्थ्यांनी मनापासून घेतला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, संघभावना, शिस्त, सहकार्य आणि खिलाडूवृत्ती विकसित करण्याचा संदेश देण्यात आला. संपूर्ण क्रीडा दिन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.