शनिवार दि. २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण करून त्यांना मैदानाकडे वळविणारा आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास माजी विद्यार्थी व आंतरराष्ट्रीय क्रीडापटू तेजस शिगवण, राष्ट्रीय खेळाडू उमेश शिंदे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापिका आशा माने यांनी प्रास्ताविकातून खेळाचे महत्त्व विशद केले. खेळामुळे विद्यार्थ्यांचा केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक विकासही साधला जातो, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मार्गदर्शन करताना उमेश शिंदे यांनी, “शाळेच्या मैदानावर खेळणाऱ्या विद्यार्थ्यांमधूनच भविष्यात राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडू शकतात,” असा प्रेरणादायी संदेश दिला. तेजस शिगवण यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलवरील गेम्सपेक्षा मैदानावरील खेळांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. नियमित सराव, मेहनत आणि जिद्दीने प्रयत्न केल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला चांगला खेळाडू म्हणून यश मिळवता येते, असे त्यांनी सांगितले.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपमुख्याध्यापक महेश जोशी यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश शेलार यांनी केले, तर पर्यवेक्षक अंजली गोरे यांनी उपस्थितांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंजुषा शेलुकर यांचे सहकार्य लाभले.